दार उघडले...
वेळ सकाळी दहाची.
सर नमस्कार, असे म्हणत आमच्या
गावचे उपसरपंच सोबत एक तिशीतला तरुण व बारा-तेरा वर्षाच्या एक मुलगा असे तिघेजन शाळेच्या
कार्यालयात प्रवेशकर्ते झाले. शाळेत दाखल होताच शाळेच्या मुख्याध्यापकांनी
सर्वांना नमस्कार केला व बसण्याची विनंती केली. बसता बसताच उपसरपंच म्हणाले, “ अहो, या पोराच्या
शाळेच्या तेवढं बघा साऱ्या गावातन फिरतया.”
या अनपेक्षित प्रश्नाने आम्ही सारे
चक्रावलो.
“नेमकं काय म्हणताय ?” मी.
“अहो या पोरांचे शाळेत वय हाय का नाय.”
“ हो “
“मग याने शाळेत यायचं का गावातन फिरायचं.”
“हो बरोबर आहे. पण हा कोण कुठला याची ओळख तर
सांगा.”
आपली बोलण्यातली
चूक लक्षात येताच उपसरपंच म्हणाले, “ हे असं होते बघा. जे सांगाय पाहिजे तेच राहिलं
आणि बाकीचे बोलत बसलो.”
“ ठीक आहे आता सांगा.”
“ हा आपल्या गावचा पोरगा. काही वर्षांपूर्वी
आपलं गाव सोडून गेला. दहा-बारा दिवसापूर्वी आपल्या गावात आलाय. याच एवढे शाळेच बघा. ” उपसरपंच.
आता आम्हाला सारा उलगडा झाला. आम्ही त्याच्या वडीलाकडे मोर्चा
वळवला.
“सांगा याला का शाळेत नाही पाठवत.” मुख्याध्यापक.
“अहो गुरुजी, याचा दाखलाच नाही
मग कसं पाठवायचं.” वडील
“म्हणजे याला शाळेत घातलं नाही. “ मुख्याध्यापक
“तसं नव्हे हो. असे म्हणून वडील काहीसे भाऊक
झाले. थोडे थांबून पुन्हा म्हणाले, “ गुरुजी याची लय मोठी
कथा आहे.”
“आता हे पहा. त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्हाला
सांगावं लागेल. “ मुख्याध्यापक
हो सांगतो. म्हणून वडील बोलायला लागले. “माझं गाव हेच. मी गवंडी
काम करून जगतो. माझ्या लग्नाला झाली आता दहा पंधरा वर्षे. मला दोन मुलं थोरला यश आणि
धाकटा सुयश. संसार सुखाचा होता. कधी कधी आम्हा नवरा-बायकोच्यात कुरबूर व्हायची. ती
कुणाच्यात नसत्या पण एकदा अशाच वादात माझी व बायकोची कडाक्याची भांडण झाली.त्याचा राग मनात
धरून ती जी दोन मुलांना घेऊन माहेरी गेली ती गेलीच. पुन्हा काय आली नाय. मी पण
आणली नाय.मला हे पण माहीत नव्हतं ही हायत का नाहीत, पण दैव बघा आता महिनाभरापूर्वी पुण्याच्या
रस्त्यावर हा पोरगा माझ्या एका पाहुण्याच्या पोराला दिसला.पुन्हा त्याला घेऊन आलोय, पण आता एकच विनंती आहे. याला तेवद्धा शाळेत घ्या.”
हे सर्व ऐकून आम्ही सर्दच झालो. काय बोलावे असा प्रश्न मला पडला. माझी नजर या
बारा-तेरा वर्षाच्या चुणचुणीत मुलाकडे गेली त्यावेळी
तो कुठेतरी शून्यात हरवलेला होता.
“काय सुयश, तुला यायच आहे का
शाळेत ?” मी.
“हो सर. मला घ्याल का ? “
“हो नक्कीच.”
“मला सांग, आधी तू शाळेत
गेला होतास का ? ”
“हो सर. या शाळेत दुसरीपर्यंत शिकलो आहे.” सुयश
“पुढे मग कुठे गेलास ?”
“पुण्यातील जिजामाता प्राथमिक शाळा खडकी
येथे गेलो.” सुयश
“ अरे मग सोप्प आहे. तू जिथे गेला होतास तिथून
दाखला मागून घेऊ. तू काळजी करू नको.” आमचे
मुख्याध्यापक म्हणाले. आता याला नियमितपणे शाळेत पाठवा. आपण
याची सर्व माहिती शोधू असे म्हणून मुख्याध्यापकांनी आलेल्यांना निरोप दिला.
परिपाठाची वेळ झाल्याने आम्ही सर्व परीपाठासाठी मैदानावर गेलो. परिपाठ झाल्यावर मी माझ्या सातवीच्या
वर्गात आलो आणि मुलांना विचारले, “तुम्हाला सुयश आठवतो का रे.”
“आता आला होता तोच ना.”
“ हो.”
“ हो.आमच्या सोबत होता पहिली दुसरी ला पण तिसरी
तो बाहेर कुठेतरी गेला.” मुले म्हणाली.
मला शाळेत घ्याल का ? हा सुयश ने विचारलेला प्रश्न मात्र माझ्या मनात घोळत होता. प्रश्न
विचारताना त्याची झालेली अगतिकता व शिकण्याची ओढ पाहून माझे मन
अस्वस्थ झाले. मी तडक शाळेच्या
कार्यालयात गेलो. मुलांचे एक नंबरचे रजिस्टर
घेऊन त्याचे नाव शोधू लागलो.
शोधताना याची नोंद सापडली ती अशी, हा आमच्या शाळेतून 19/ 7/ 2014 ला जिजामाता प्राथमिक शाळेत गेलेला होता. आता
शाळेचे नाव तर मिळाले होते. प्राथमिक शाळा आहे म्हंटल्यावर त्याची नोंद सरला
पोर्टलवर असणारच. याची पक्की खात्री असल्याने सरल पोर्टल वर शाळेचे नाव टाकून माहिती
सर्च केली. शाळेचे नाव टाकताच माझ्यासमोर शाळेचा यु डायस नंबर, मुख्याध्यापकाचे नाव, मुख्याध्यापकाचा संपर्क
क्रमांक सारी माहिती क्षणार्धात समोर आली. या शाळेचे
केवळ नाव असताना काही क्षणात सारे तपशील समोर आले. तंत्रज्ञानाचा
फायदा असाही होऊ शकतो. हे समजून आले.
मुख्याध्यापकांचा
संपर्क क्रमांक मिळाल्याने त्यावरती फोन करून मुख्याध्यापकांना सारा तपशील
सांगितला. आमचे प्रयत्न आणि पाठपुरावा पाहून
श्रीमती लेने मॅडम याही भारावल्या. विशेष म्हणजे त्यांना हे जास्त भावले की त्यांनी सरळ मला प्रश्नच
केला की, “ माझा मोबाइल नंबर तुम्हाला कसा मिळाला.” तेंव्हा
त्यांना सारी हकीकत सांगीतली व माहितीचा शोध घेण्याची विनंती केली. त्यांनीही
आपल्या समोरील काम थांबवून माहितीचा शोध घेतला व माहिती
दिली ती अशी, सुयश तिसरी 22/07/2014 ला
आला. चौथी पर्यंत शिकला. आमची शाळा चौथीपर्यंत असल्याने पुढील शिक्षणासाठी त्याच्या बहिणीने
त्याचा दाखला नेला. तशी नोंद त्यांच्या दप्तरी आहे. पण पुढील
शिक्षणासाठी कोणत्या शाळेत प्रवेश घेतला याची नोंद मात्र त्यांच्याकडे काही सापडू
शकले नाही.
आता मात्र हे सर्व सुयशशी बोलल्या नंतर समजणार होते. दुसऱ्या दिवशी शाळेत अगदी आनंदाने तो आला. त्याची
इतर मुलासोबत ओळख करून दिली. नंतर त्याला समोर बोलवून
विचारले, “ तू पाचवी ला कुठे प्रवेश घेतलास ?
तुला काही आठवते का ? “
“ माझी चौथी झाल्यावर तिथे पुढे शाळा नसल्याने
लातूरच्या आश्रम शाळेत टाकण्यात आले. पण मला त्या
शाळेचे नाव आठवत नाही.”
आधी
निदान शाळेचे नाव तरी होते. पण आता फक्त शहराचे नाव. लातूरच्या शाळेचे नाव
शोधायचेच या जिद्दीने कामाला लागलो. यात पुन्हा हा
पाचवीला गेला खरा. पण तो तिथे फारसा रमला नाही. त्यातच
ती शाळा सोडून तो पुन्हा पुण्याला निघून आला. शिकण तर
बंद झालेलं होतंच. जगण्यासाठी मग कुठे चायनीजच्या गाडीवर काम कर, लाकडाच्या वाखारीत
काम कर, कुठे बारीकसारीक काम कर व येणाऱ्या पैशातून पोटाची भूक भागव. कुठेतरी
जाऊन झोप. ना राहण्याच्या ठिकाणा, ना शिक्षणाचा. अशा अवस्थेत
तो वर्ष-दीड वर्ष पुण्यामध्ये होता. त्यातच त्याची एका
व्यक्तीशी ओळख झाली व तो त्याच्यासोबत लाकडाच्या वखारीत मध्ये काम करू लागला आणि आपले दिवस ढकलू लागला.
अशातच एके दिवशी तो पुण्यातून रस्त्यावरून फिरत असताना त्याला त्याच्या आतीच्या मुलाने पाहिले. हा येथे का फिरतोय ? हे बघून त्याने याला हटकले.त्यावेळी सुयशने
त्याला ओळखले. त्यानंतर त्याने त्याला बाजूला घेऊन सुयशच्या
वडिलांना फोन करून कळवले की हा पुण्यामध्ये आहे. हा कुठे राहतो याची सर्व माहिती वडिलांना कळविल्याने वडिलांनी जाऊन त्याला
पुण्यातून पुन्हा दहिवडी येथे आणले. अशी माहिती सुयशने आम्हाला दिली होती.
आमच्या सांगली
जिल्ह्यात लातूरची
अनेक शिक्षक मंडळी नोकरीनिमित्त आहेत. काहीजन नुकतेच बदलून गेले आहेत. त्यातील बर्याच जणांना फोन करून संबंधित शाळेचे नाव सापडते का पाहण्यास
सांगितले. पण कुठेच याचा संदर्भ लागेना. पूर्वी लातूर जिल्ह्यात पोलीस शिपाई म्हणून
कार्यरत असलेले व आता सांगली जिल्ह्यात आटपाडी येथे
पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असणारे श्री संतोष बेबडे हे माझ्या जून्या सहकारी मॅडम
यांचे पती आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला व त्यांना सर्व
हकीकत सांगितली. श्री बेबडे यांनी संबंधित पोलिस
स्टेशनला फोन करून शाळेचे नाव कुठे सापडते का ? हे शोधण्याचा
प्रयत्न केला . पण तो जे नाव सांगतो त्याचा कुठे संदर्भ लागेना. शेवटी त्यांचाही नाईलाज झाला. मलाही त्याचे वय पाहता खूप काही विचारता येईना.
आमची ही सगळी धडपड पाहून
शाळेचे मुख्याध्यापक श्री एन. टी. पाटील सर, माझे
सहकारी श्री एन. डी. पाटील सर, श्री
राजेंद्र कोळी सर व श्री लक्ष्मण शिंदे सर
आम्ही सर्वजण आपापल्या परिचयातील व
लातूरशी संबंधित असणाऱ्या शिक्षका बरोबर चर्चा केली. पण कुठेच धागा लागेना.
शेवटी ही घटना आम्ही आमचे गटशिक्षणाधिकारी श्री
प्रदीपकुमार कुडाळकर, शिक्षण
विस्तार अधिकारी श्री प्रकाश कांबळे यांच्या कानावर घातली. त्यांनीही याचे महत्व समजून सुयश चे शिक्षण जे बंद झाले आहे. ते सुरू झाले
पाहिजे असा आशावाद व्यक्त केला.
पुन्हा
मी शाळेतल्या सर्व सहकारी शिक्षक व आमचे मुख्याध्यापक यांचेसोबत सविस्तर चर्चा
केली केली. व्यवस्थापन समितीला विश्वासात घेतले. आरटीई 2009
या शिक्षण हक्क कायद्याचा आधार घेऊन त्यास वयानुरूप समकक्ष वर्गात म्हणजे त्याच्या
पूर्वीच्या मित्रांच्या वर्गात त्याला प्रवेश दिला.
ती तारीख होती २२/१२/२०१८ .
आम्हा
सर्वांच्या प्रयत्नाने त्याचे बंद झालेले शिक्षण आरटीई 2009 या अधिनियमामुळे पुन्हा सुरू झाले. नव्या
जिद्दीने तोही आता शाळेमध्ये नियमित येऊ लागला आहे. शिक्षण हक्क कायद्याचा वापर करून याचा लाभ एका
गरजू विद्यार्थ्यांला उपलब्ध करून देऊ शकलो याचा मनस्वी
आनंद झाला. मला आशा आहे की शिक्षणाची ही गंगा अशीच या पुढेही
सुयश सारख्या शिक्षणापासून दूर गेलेल्या
मुलांनसाठी पुन्हा वाहू लागेल व शिक्षणाची दारे सदैव त्यांच्यासाठी उघडी राहतील याची मला खात्री आहे
लेखक -श्री अजय महादेव काळे
[ 9921689468 ]
|